दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding or encircle.
सजीव निर्जीव यांच्या मधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रिया मधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.
पर्यावरण दिन साजरा करण्यामागील मुख्य हेतू
- पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,
- समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे
- पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
सजीव निर्जीव यांच्या मधील क्रिया प्रतिक्रिया व आंतरक्रिया मधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धा नंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याच प्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळा बरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. म्हणून १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.
मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाय योजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे. त्यादृष्टीने पर्यावरणाचा अभ्यास तीन भागात करणे आवश्यक आहे. ते तीन भाग म्हणजे पर्यावरण विज्ञान, पर्यावरण शिक्षण आणि पर्यावरण तंत्रज्ञान.
पर्यावरण विज्ञान :
यामध्ये तत्त्व, सिद्धांत व जैविक अजैविक घटका मधील आंतरक्रियांचा समावेश होतो. पर्यावरण शिक्षणात परिसंस्था- रचना, कार्य, संरक्षण व संवर्धन, जैवविविधता, प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती मानवी व नैसर्गिक, जैवलोकसंख्या, पर्यावरणाचा धारणक्षम निरंतर शाश्वत विकास आणि पर्यावरणीय संस्थांच्या भूमिका व कार्याचा यात ऊहापोह होतो. यामध्ये मृदावरण, जीवावरण, जलावरण व वातावरण या सर्व घटकांचाही समावेश आहे. पर्यावरणाच्या अभियांत्रिकी शाखा मधून पर्यावरणातील विविध तत्त्व, संबोधक आणि सिद्धांता सोबतच विविध पर्यावरणातील घटकांचे विश्लेषण, तत्त्वज्ञानाचे उपयोजन आणि पर्यावरण संरक्षण व संधारणासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या ‘मॅन अँड नेचर’ या पुस्तकात मानव व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी ‘द आऊटलूक टॉक’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य ‘पर्यावरण शिक्षण सुधारणा’ असे होते.
पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला.
जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली.
पर्यावरण शिक्षण:
यात पर्यावरणा विषयी ज्ञान, आकलन, कौशल्य, जागृती आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन प्रत्येकाने आपली सकारात्मक मनोभूमिका निर्माण करते. तसेच पर्यावरण शिक्षण ही एक सातत्यपूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आणि हे शिक्षण सर्व शालेय स्तरावर औपचारिक व अनौपचारिक स्वरूपात असेल; जेणेकरून पर्यावरणबविषयक एकसंध आणि संतुलित दृष्टिकोन प्रत्येक मानवा मध्ये निर्माण होईल. आपल्या देशात पर्यावरणाची गुणवत्ता विकसित करणे, जनते मध्ये पर्यावरण संरक्षणाची व संधारणाची ऊर्मी निर्माण करणे आणि निर्णय घेण्याची पात्रता विकसित करणे ही पर्यावरण शिक्षणाचे मुख्य ध्येये ठरविण्यात आली.
पर्यावरण शिक्षण सद्य स्वरूप :
बिलिसी येथे भरलेल्या पर्यावरण विषयक परिषदेत पर्यावरण शिक्षणाची खालील तत्त्वे निश्चित करण्यात आली-
पर्यावरणीय शिक्षणात सामाजिक तंत्रज्ञान विषयक आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हावा.
पर्यावरण शिक्षण ही एक जीवनभर चालणारी शिक्षण प्रणाली असावी, ज्यात शाळापूर्ण शिक्षण, औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण यांचा समावेश असावा.
अध्ययन कर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी नियोजन व अंमलबजावणी करण्याची संधी द्यावी.
पर्यावरण शिक्षणाचा उपागम (Approach) आंतर विद्याशास्त्रीय असावा. त्यातून विद्यार्थ्यांचा पर्यावरण विषयक एकसंध व संतुलित दृष्टिकोन निर्माण व्हावा.
वास्तव जीवनाशी निगडित समस्या याच पर्यावरण शिक्षणाच्या केंद्रस्थानी असाव्यात.
पर्यावरण विषयक सकारात्मक दृष्टिकोन व मूल्य निर्मिती करणे ही या शिक्षणाची महत्त्वपूर्ण उद्दिष्टे असावीत.
प्रमुख पर्यावरणीय प्रश्नाची उकल स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सहकार्यातून करावी.
आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१८ डिसेंबर २००३) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठय़क्रम ठरविण्यात आले आहेत.
पर्यावरण संवर्धन व संरक्षण
प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे याची जाणीव सर्वांना असून त्याचा वापर थांबविण्यावर आपण भर दिला पाहिजे. अशा परिस्थितीत यंदाची थीमही यावर आधारित असून, ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन’ असे नाव देण्यात आले आहे.
ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व डोंगमाथ्यावरील मातीची धूप रोखण्यासाठी आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी बांधावर विविध देशी झाडे लावावी.
पर्यावरणाच्या र्हासामुळे बदललेले निसर्गचक्र व त्यामुळे नेहमीच येणारे ओल्या-सुक्या दुष्काळाचे दुश्चक्र आपण सातत्याने अनुभवित आहोत.
अन्न, वस्त्र व निवारा तसेच आरोग्यदायी पर्यावरण या मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहे.
शेतक-यांनी पारंपरिक शेती आणि पर्यावरणाला अनुकूल विषमुक्त शेती पद्धतीचा शेतीसाठी उपयोग केला पाहिजे
घातक कीडनाशकांचा अनियंत्रित वापर मानव व पर्यावरणाला धोकादायक ठरत आहे.
हायब्रीड बियांण्यांमुळे पारंपारिक बियाणेसुद्धा कायमचे नष्ट होत चालले आहे,पारंपारिक बियाण्याशिवाय पर्यावरणपूरक, सुरक्षित, व विषमुक्त आहार देणारी शेती अशक्य आहे,
देशी गाईंच्या शेणामध्ये अनेक घटक आहेत, ज्यात माणूस, शेती पर्यावरण, भावी पिढीचा विकास या गोष्टींचा अंतर्भाव आहे.
शेती केवळ भौतीक जीवन फुलवते असे नसुन नैतीक आत्मिक व पर्यावरणीय अंगांनी जीवन परिपुर्ण करते.
पर्यावरण दिन हा फक्त एकच दिवस साजरा करण्याचा नसुन , पर्यावरण रक्षण ही रोजची जबाबदारी आहे. हा वसा एकदा घेतला की टाकून चालणार नाही.
चला आपण सर्व मिळून पर्यावरण संवर्धन व संरक्षण करूया.
0 Comments