राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ यांच्यावर आधारित एक छोटे आणि प्रभावी भाषण
राजमाता जिजाऊ भाषण
आदरणीय व्यासपीठ, गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो,
"मुजरा माझा माता जिजाऊला, जिने घडविले राजा शिवबाला..."
आज आपण अशा एका महान मातेबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमानाने जगायला शिकवले. त्या म्हणजे राजमाता जिजाऊ.
जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. जिजाऊ केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या एक उत्तम राजकारणी, युद्धनिपुण आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्या होत्या.
त्या काळात रयत परकीयांच्या जाचाखाली भरडली जात होती. स्त्रियांची अब्रू सुरक्षित नव्हती आणि मंदिरे पाडली जात होती. हे चित्र बदलण्यासाठी जिजाऊंनी बाल शिवबावर अन्यायाविरुद्ध लढण्याचे संस्कार केले. त्यांनी शिवरायांना रामायण-महाभारतातील गोष्टी सांगून शौर्य शिकवले आणि हातात तलवार देऊन युद्धकला शिकवली.
जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळेच शिवरायांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी 'स्वराज्याची' शपथ घेतली. जर जिजाऊ नसत्या, तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले नसते. म्हणूनच जिजाऊंना 'स्वराज्याची जननी' म्हटले जाते.
आजच्या काळातही प्रत्येक घरात जिजाऊंच्या विचारांची गरज आहे. स्त्रियांनी केवळ चूल आणि मूल यात न अडकता जिजाऊंप्रमाणे धाडसी आणि स्वावलंबी बनायला हवे.
अशा या थोर राष्ट्रमातेला माझे कोटी कोटी प्रणाम!
जय जिजाऊ, जय शिवराय!
राजमाता जिजाऊ वेशभूषा | राजमाता जिजामाता वेशभूषा - Click Here





0 Comments