Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

देशभक्त विठ्ठल सखाराम पागे ऊर्फ वि. स. पागे

*स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते,  महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक...*
     *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*

*●जन्म :~ २१ जुलै १९१०* बागणी ता. वाळवा, जि. सांगली
●मृत्यू :~ १६ मार्च १९९०

     प्राथमिक शिक्षण तासगाव येथे घेऊन विलिंग्डन महाविद्यालयातून सांगली येथील महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत या विषयात बी.ए. ऑनर्स पदवी प्राप्त केली. सन 1929 मध्ये देशात यूथ लीगची चळवळ सुरू होती. त्या चळवळीत विद्यार्थी नेते या नात्याने विलिंग्डन महाविद्यालयावर तिरंगा फडकवण्यात ते यशस्वी झाले. 1930 मध्ये जंगल सत्याग्रह, 1931 चा मिठाचा सत्याग्रह यात भाग घेतल्याबद्दल त्यांना सहा महिने कारावास व 100 रुपये दंड करण्यात आला.

      सन 1935 ते 36 या काळात त्यांनी कोल्हापूर येथील विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली व कऱ्हाड येथे वकिलीच्या व्यवसायास प्रारंभ केला, परंतु त्यांच्या मनात व्यवसायापेक्षा गरीब समाजाची वकिली करून त्यांचे प्रश्‍न, समस्या सोडवण्यात काळ व्यथित करावा असे वाटले. त्यामुळे ते पुन्हा आपल्या मूळ गावी परत आले व कॉंग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले. म. गांधींनी "चले जाव'ची घोषणा केली. यामध्ये प्रत्येक गावचावडीवर एकत्र तिरंगा फडकवणे व गाव मुक्त करणे असा कार्यक्रम आखण्यात आला.

     3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव तालुक्‍यातील पाच हजार स्वातंत्र्यसैनिकांचा विराट मोर्चा तासगाव येथील दिवाणी कोर्टावर व तहसील कचेरीवर नेण्यात आला. मोर्चाची मिरवणूक प्रथम दिवाणी कोर्टाच्या दारात आली. त्या वेळी न्यायाधीश एच. एस. पाटील हे स्वतः गांधी टोपी घालून न्यायदानास बसत असत. त्यांनी स्वतः राष्ट्रीय निशाण लावून स्वातंत्र्यसैनिकासह झेंड्याला सलामी दिली. त्यानंतर हा मोर्चा तहसीलदार कचेरीवर गेला, त्या वेळी असलेले तहसीलदार निकम यांनी दिवाणी न्यायाधीश पाटील यांच्या चिठ्ठीवरील सूचनेनुसार तहसील कचेरीवरचा युनियन जॅक खाली उतरविला. नंतर आपले राष्ट्रीय निशाण फडकवून सर्व सैनिकांसह स्वतः झेंड्याला सलामी दिली व तालुका मुक्त झाल्याचे घोषित केले. यानंतर अत्यंत प्रेरणादायी भाषण वि. स. पागे यांनी केले.

     पुढे 1952 ते 1978 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. त्यातील 1960 ते 1978 या कालखंडात ते विधान परिषदेचे सभापती होते. सन 1961 ते 1979 या कालखंडात ते राज्य ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष होते. सन 1979 ते 90 ते रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष या होते. या काळात शासनाने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा, सेवासुविधा, बंगला, गाडी, भत्ते देऊ केले; परंतु त्यांनी केवळ मासिक एक रुपया एवढ्याच मानधनावर काम केले. बागणी या मूळ गावी असणारी सुमारे 21 एकर जमीन आपल्या कुळांना दिली. राहते घर, वाडा बागणी ग्रामपंचायतीस देणगी म्हणून दिला.

      1972 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागात रोजगाराचा मोठा प्रश्‍न पडला होता. विसापूर (ता. तासगाव) येथे आमच्या हातास काम द्या, पोटाला अन्न द्या, अशी मागणी पागेसाहेबांकडे लोकांनी केली व संपूर्ण देशातील श्रमिकांना वरदान ठरलेली "रोजगार हमी योजना' तेथेच जन्माला आली.
आज राज्यात 365 दिवसांची हमी आहे. ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना कामाची हमी देणारी ही जगातील एकमेव योजना आहे. दारिद्य्रनिर्मूलन व ग्रामीण विकासाचे प्रभावी साधन म्हणून या योजनेकडे पाहिले जाते. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. अमर्त्य सेन यांनीदेखील या योजनेचे कौतुक केले. महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांची कामे या योजनेमधून झाली.

Post a Comment

0 Comments

close