छातीत जळजळ होणे याला ॲसिडिटी किंवा मराठीत आपण त्याला आम्लपित्त असे म्हणतो. ह्याचा त्रास प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा होतोच!
ॲसिडिटीचा त्रास म्हणजे आपल्या जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होते. हे आम्ल जठरात गॅस्ट्रिक ग्लॅन्डसमधून स्रवले जाते व ह्यामुळे अन्नाचे पचन होते. हे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु हे जास्त प्रमाणात स्रवले गेले तर ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
☘️ अपुरी झोप, जेवणाच्या वेळेत अनियमितता, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, अति तेलकट, मसालेदार अन्न खाणे, विरुद्ध आहार घेणे, धुम्रपान करणे, मद्यपान करणे, सततची काळजी व ताणतणाव या अशा कारणांनी छातीत जळजळ ( ॲसिडिटी ) व्हायला लागते.
तसेच जर काही वेदनाशामक किंवा प्रतिजैविके घेतली किंवा ऍस्पिरिन व सांधेदुखीची औषधे सुरू असली तरीही ऍसिडिटी वाढू शकते.
ॲसिडिटीची लक्षणे
छातीत किंवा घशात जळजळणे, पोटात आग पडणे, वारंवार कडू-आंबट पाणी घशाशी येणे, अस्वस्थ वाटणे, हातापायांच्या तळव्यांची आग होणे, करपट ढेकर येणे, अंगावर लाल रंगाच्या रॅशेस येणे, अंगाला खाज सुटणे, चक्कर येणे, आंबट उलटी झाल्यानंतर बरे वाटणे ही ॲसिडिटी वाढण्याची प्रमुख लक्षणे आहेत.
ॲसिडिटी साठी कोणते उपाय करावेत?
१. आहारात बदल
ॲसिडिटी साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहारात अति तेलकट, तिखट आणि मसाल्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा, असे केल्याने तुम्हाला छातीत जळजळ होणार नाही.
२. जेवण सावकाश करा
जेवण करताना घाई करू नका. जेवण आरामात करा जेणेकरून प्रत्येक घास व्यवस्थित चावला जाईल. प्रत्येक घासासोबत पाचक रस व्यवस्थित मिसळला जाईल आणि अन्नाचे पाचन व्यवस्थित होईल. छातीत जळजळ होणार नाही.
३. गूळ
गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे आतड्याची शक्ती वाढते. त्यामुळे दररोज जेवण झाल्यानंतर छोटासा गुळाचा खडा घ्या अन तो चावून न खाता तोंडात ठेवून चघळा. यामुळे पोटाची पचनक्रियेची क्षमता वाढते आणि जळजळ होण्याची समस्या दूर होते.
३. बडीशेप
जेवण झाल्यानंतर बडीशेप खाणे ही चांगली सवय आहे. चिमुटभर भाजकी बडीशेप खाल्याने पाचनशक्ती सुधारण्यास मदत होते. अपचन आणि छातीत जळजळ यावर बडीशेप हा सोपा व प्रभावी उपाय आहे.
४. आवळा
जेवण झाल्यानंतर आवळा सुपारी, किंवा एक चमचा आवळ्याचा मोरावळा खा. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते.
५. शहाळ्याचे पाणी
शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील पीएच ॲसिडिक लेव्हल कमी होऊन अल्कलाईन होते. ह्याने पोटात आवश्यक असलेले म्युकस सुद्धा तयार होते. ह्या म्युकसमुळे अतिरिक्त प्रमाणात ॲसिड तयार झाल्यास पोटाचे रक्षण होते. शहाळ्याच्या पाण्याने अन्नपचन सुधारते व ॲसिडिटी वाढणे कमी होते.
६. तुळशीची पाने
तुळशीच्या पानांमध्ये सुदींग आणि कार्मीनेटीव्ह म्हणजेच पोटाला आराम वाटावे असे गुणधर्म असतात. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास थोड्याच वेळात कमी होतो. तुम्हाला थोडीही जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चावून चावून खा किंवा ३-४ पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या.
७. दालचिनी
दालचिनी हे नैसर्गिक अँटासिड आहे. ह्याने बिघडलेले पोट जागेवर येते. अन्नपचन सुधारते आणि शरीरात पोषणमूल्ये शोषण्याचे कार्य सुरळीत होते. गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅकमध्ये इन्फेक्शन असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दालचिनीचा काढा उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत.
८. ताक
ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे. छातीत जळजळत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सैंधव मीठ, किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो. मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक हा त्यावरचा रामबाण उपाय आहे. ताक पोटातील ॲसिडिटी न्यूट्रलाइज करते.
९. आलं
आल्यामध्ये तर अनेक औषधी गुण आहेत. आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक तसेच दाहशामक गुणधर्म आहेत. पोटातील ॲसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आल्याचा तुकडा चावून चोखल्यास किंवा आल्याचा रस घेतल्यास फायदा होतो. मळमळ, उलटी, पित्त वाढणे ह्यावर आल्याचे पाचक तर ट्राईड अँड टेस्टेड औषध आहे.
१०. लवंग
आयुर्वेद औषधांमध्ये लवंगीला महत्वाचे स्थान आहे. पोटाच्या विकारांसाठी लवंग गुणकारी आहे. लवंगीत कार्मीनेटीव्ह गुणधर्म म्हणजेच वात तयार न होण्याचे गुणधर्म असल्याने लवंग खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होत नाही.
११. केळी
केळ्यामध्ये नैसर्गिक अँटासिड्स असतात. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर केळी खाणे अतिशय चांगले आहे. केळी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो.
१२. फळे
ॲसिडिटी वाढली असताना कलिंगड, सफरचंद व डाळिंब खाल्ल्याने सुद्धा आराम मिळतो. ॲसिडिटी कमी होते तसेच ॲसिड रिफ्लक्स सुद्धा कमी होतो.
आणखी वाचा.
महत्त्वाचे - ॲसिडिटीवर तात्पुरता उपाय करून उपयोगाचे नाही. नेहेमी नेहेमी सोडा पिणे, इनो घेणे, किंवा अँटासिड घेणे ह्याचेही शरीरावर गंभीर परिणाम होतात. अँटासिडमुळे पेप्सीन (एक पचनासाठी आवश्यक असलेले एन्झाईम )चे कार्य सुद्दा कमी होते. त्यामुळे योग्य आहार, तणावरहित जीवन जगणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे.
0 Comments