राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी Happiness Curriculum अर्थात आनंददायी अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. "Happiness Curriculum" ही संकल्पना जगातील अनेक देशांनी स्वीकारलेली आहे. तसेच राज्यातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये मागील शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून आनंददायी शिक्षण कार्यक्रम कार्यान्वित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये सजगता, कथा, कृती, अभिव्यक्ती या बाबींचा विचार करण्यात आलेला आहे. सदर आनंददायी शिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून अध्ययनाविषयी त्यांची रुची वाढल्याचे निदर्शनास येत आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येणारे शैक्षणिक उपक्रम पाहण्यासाठी येथे टच करा. -Click Here
विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ पासून इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय परिपाठात Happiness Curriculum अर्थात आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय 2022 या वर्षातील सर्व शासन निर्णय - Click Here
आनंददायी अभ्यासक्रमाचा उद्देश -
१) विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे.
३) शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे.
४) विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे,
(५) विद्याथ्यांमध्ये स्व ची जाणीव विकसित करणे.
(६) विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे.
(७) विद्याथ्यांना समस्या निराकरण करण्यास सक्षम बनविणे,
(८) विद्यार्थ्यांमधील शिकण्याविषयीची भिती, नैराश्य इ. दूर करणे.
आनंददायी अभ्यासक्रमाचे स्वरूप
विद्यार्थ्यांनी स्वतःमधील आनंदाला समजणे, तो अनुभवणे व तो आनंद मिळवता येणे यासाठी यापाठ्यक्रमात पुढील चार घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
१. सजगता
२. कथा (गोष्ट)
३. कृती
४. अभिव्यक्ती
५. छंद
आनंददायी अभ्यासक्रमाचे साप्ताहिक नियोजन खालील प्रमाणे असेल
१. सोमवार - सजगता
२. मंगळवार - कथा (गोष्ट)
३. बुधवार - कथा (गोष्ट)
४. गुरुवार - कृती
५. शुक्रवार - कृती.
६. शनिवार - अभिव्यक्ती / छंद
शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेतील ३५ मिनिटांमध्ये करावयाच्या आनंददायी शिक्षणाच्या विविध कृतींचे नमुने देण्यात आलेले आहेत. या घटकांमध्ये शिक्षकांना पुढील प्रमाणे अथवा काही नव्याने विविध आनंददायी कृर्तीचा समावेश करता येईल.
अ. सजगता - श्वासांवरील क्रिया - समज पूर्वक श्वसन, ज्ञानेन्द्रियांशी संबंधित क्रिया, आलाप, ऐका व कृती करा, हृदयाचे ठोके जाणणे, ताणावर लक्ष, मुक्त हालचाली, भावनियंत्रण, चालण्याच्या कृती, तसेच सवयी. जबाबदारी, स्वच्छता, अनुभव, विचार आदीचे चित्रांकन, शब्दांकन. ( प्रत्येक सप्ताहाच्या सोमवारी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेमध्ये वर्गनिहाय सजगता अंतर्गत अशा विविध कृती घेता येतील.)
आ. गोष्ट (कथा) - १. प्रत्येक सप्ताहाच्या मंगळवारी शिक्षकांनी स्वतः गोष्ट सांगून प्रश्न विचारावेत. २. बुधवारी त्याच गोष्टींची पुनरावृत्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावी. ३. गोष्ट ही मूल्ये, गाभाघटक, जीवन कौशल्ये, जबाबदारीचे भान याची जाणीव करून देणारी असावी. ४. गोष्ट २० ते ३० ओळींचीच असावी. जेणे करून मुलांमध्ये कष्ट, वैज्ञानिक दृष्टीकोन, जिज्ञासा व जिद्द या वृत्ती तयार होतील. (प्रत्येक सप्ताहात गोष्ट नाविन्यपूर्ण असावी.)
इ. कृती ( गतिविधी) - प्रत्येक सप्ताहाच्या गुरुवार, शुक्रवार रोजी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेत विविध कृतींचा समावेश करता येईल. कृती किंवा अनुभवामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होतील, अशी कृती शिक्षकांनी लिहावी आणि सदर कृती विद्यार्थ्यांकडून करवून घ्यावी. या घटकामध्ये शिक्षकांना पुढीलप्रमाणे अथवा काही नव्याने कृती घेता येईल.
१. गोलातील खेळ गप्पा २. सहाध्यायी जोडी सवयी सांगणे. ३. हास्य क्लब ४. माझे शरीर. ५. चेंडूचे खेळ ६. अंताक्षरी, जुगलबंदी ७. मला वाटते. ८. ओळखा पाहू. ९. भूमिका अभिनय १०. ऐका करा. ११. आकार बनवू १२. आभार मानू १३. माझी आवड १४. सापशिडी १५. चला शोधू १६. सहल, परिसर भेट १७. आठवडी बाजार १८ कलाकार, लेखक यांचे अनुभव व सादरीकरण.
ई. अभिव्यक्ती - प्रत्येक सप्ताहाच्या शनिवारी शालेय परिपाठामध्ये अभिव्यक्तीसाठी काही उपक्रम घेता येईल. कृतज्ञता, स्नेह, ममता, सन्मान व्यक्त व्हावा असे प्रश्न शिक्षकांनी विचारून विद्यार्थ्यांना बोलण्यास संधी द्यावी, जसे १, प्रसंगनाट्य २. चालता बोलता ३. कला, क्रीडा व कार्यानुभव अंतर्गत विविध उपक्रम ४. बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणारे उपक्रम ५. शाळेचे कलापथक, गीतमंच ६. बातम्या वाचन, निवेदन ७. संवाद ८. प्रश्न विचारा आम्हाला ९ वेशभूषा भूमिका अभिनय १० मुलाखत ११. बालसभा १२. अवांतर वाचन १३. सूत्रसंचालन १४. प्रश्नपेढी १५. कविता गायन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय - शिक्षक, विद्यार्थी व शाळेसाठी उपयुक्त सर्व शासन निर्णय डाउनलोड करा.
आनंददायी कार्यक्रम प्रत्यक्ष अंमलबजावणी रूपरेषा व मार्गदर्शक सूचना
१. प्रत्येक दिवशी दिलेल्या साप्ताहिक नियोजनानुसार शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेला आनंददायी कृती सर्वसाधारण ३५ मिनिटांच्या असतील. शालेय स्तरावर दररोजच्या प्रति तासिकेमधून ५ मिनिटांचा कालावधी कमी करून सदर ३५ मिनिटांचा कालावधी शालेय परिपाठानंतरच्या पहिल्या तासिकेतील आनंददायी कृतीसाठी उपलब्ध करून घेता येईल. या आनंददायी कृतींची सुरुवात माईंडफुलनेस कृतींनी म्हणजेच वर्तमानात सतर्क व सचेत राहण्याच्या कृतींनी करावयाची आहे.
२. आनंददायी कृतींची सुरूवात दोन ते तीन मिनिटे चेक इन म्हणजे श्वासावर लक्ष देण्याची कृती करून केली जावी व आनंददायी कृतीची समाप्ती दोन ते तीन मिनिटे चेक आऊट म्हणजे विद्यार्थ्यांनी डोळे मिटून शांत बसून तासिकेच्या निष्कर्षावर चिंतन करणे या कृतीने केली जावी. चेक इन व चेक आऊट या कृती दररोज करणे अपेक्षित आहे.
३. शिक्षकांनी शालेय परिपाठामध्ये घ्यावयाच्या विविध आनंददायी कृतींचे कालावधी, उद्देश, कृतीचे टप्पे, चर्चेसाठी प्रश्न या क्रमाने व निकषानुसार लेखन करावे.
४. शिक्षकांनी सदर लेखन करत असताना इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याचा वयोगट, समज, भाषिक समृद्धी, परिसर ज्ञान याचा विचार करून सजगता, कथा, कृती व अभिव्यक्ती या घटकांचे विस्तारित स्वरूपात लेखन करावे. प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र, आनंददायी प्रेरक उपक्रमांचा समावेश करावा.
मूल्यमापन :
सदर अभ्यासक्रमाचे कोणतेही औपचारिक लेखी मूल्यमापन केले जाणार नाही. त्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तसेच सदर अभ्यासक्रमासाठी कोणतेही गुणदान असणार नाही. विद्यार्थी किती आनंदी राहतो. किती आनंदाने, उत्साहाने अभ्यास करतो. आनंददायी कृतीमध्ये कसा सहभागी होतो यावरून अनौपचारिकरित्या त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा अध्ययनाचा प्रवास हा सर्वार्थाने वेगळा असतो हे तत्व येथे विचारात घेतले जाणार आहे.
0 Comments