Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार; शासन निर्णय पहा.

राज्यातील उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबत.


राज्यातील खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयातील शाळांमधील सन २००३-०४ ते २०१०-११ मधील ९३५ वाढीव पदांना संदर्भाधीन क्र. १ व २ च्या शासन निर्णयान्वये व संदर्भाधीन क्र. ३ च्या शासन शुध्दीपत्रकान्वये मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. ४ च्या शासन निर्णयान्वये ४२८ पदे व्यपगत करण्यात आली. सदर ४२८ पदांपैकी शिक्षण उपसंचालक यांनी वैयक्तीक मान्यता दिलेली ६८ पदे वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्र. ६ च्या शासन निर्णयान्वये पुनर्जिवित करण्यात आली आहेत.


राज्यातील उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ मधील एकूण १२९३ शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी संदर्भाधीन क्र.७ च्या पत्रान्वये शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. सदर १२९३ पदांपैकी यापूर्वीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये व्यपगत करण्यात आलेल्या ४२८ पदांपैकी एकूण २११ पदे पुनर्जिवित करण्यास संदर्भाधीन क्र. ८ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित वाढीव पदांना मान्यता देण्याच्या विषयाच्या अनुषंगाने राज्यातील वाढीव पदांवर विहीत कार्यपध्दतीने नियुक्त आणि कार्यभार उपलब्ध असलेल्या शिक्षकांचे त्याच किंवा अन्य संस्थेमध्ये समायोजन करणेसंदर्भात संदर्भाधीन क्र.०९ अन्वये संचालक कार्यालयाकडून पडताळणी केलेल्या एकूण २१2 शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात माहिती प्राप्त झाली. संदर्भाधीन क्र. ७ व ९ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीतील वाढीव पदांवरील कार्यरत असलेल्या एकूण २८३ (२११+७२ ) पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-

राज्यातील उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीतील वाढीव पदांवरील कार्यरत असलेल्या परिशिष्ट 'अ' व परिशिष्ट 'ब' मध्ये समाविष्ट एकूण २८३ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास खालील अटीच्या अधिन मान्यता देण्यात येत आहे.


1) समायोजनाचे प्रचलित धोरण/ नियम व शासन निर्णयानुसार यासोबत जोडलेल्या यादीतील वाढीव कार्यरत असलेल्या शिक्षकांचे समायोजन पद उपलब्धतेनुसार प्रथम त्याच संस्थेत ते शक्य नसल्यास अन्य संस्थेत तथापि, त्याच विभागात संबंधित विभागीय उपसंचालक यांनी करावे. हे ही शक्य नसल्यास, अन्य संस्थेत विभागाबाहेर समायोजन करण्याची कार्यवाही संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी करावी.

2) सदरचे समायोजन करताना मागासवर्गीय आरक्षण धोरण व बिंदूनामावलीनुसार करण्यात यावे.

3) सदरहू शिक्षक यापूर्वी वाढीव पदी कार्यरत असल्याने, त्यांना शिक्षण सेवक योजनेतून सूट देण्यात यावी व समायोजनानंतर त्यांची वेतन निश्चिती नियमित वेतनश्रेणीत त्यांची नियुक्ती दिनांकापासूनची सेवा गृहीत धरुन करण्यात यावी. तथापि, सदरहू शिक्षकांना त्यांनी यापूर्वी वाढीव पदावर केलेल्या सेवेस वेतन थकबाकी अथवा सेवानिवृत्ती वेतन व इतर कोणतेही लाभ अनुज्ञेय असणार नाहीत.

4) सदरहू शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेल्या, अल्पसंख्यांक उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांना पवित्र प्रणालीचे निकष लागू असणार नाहीत. तथापि, इतर शिक्षकांना पवित्र प्रणालीचे निकष लागू राहतील.


सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असून महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.


Also Read this



राज्यातील उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा. 09 नोव्हेंबर 2023 - Click Here

राज्यातील उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत असलेल्या पात्र शिक्षकांचे समायोजन करणेबाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा. 04 डिसेंबर 2023 - Click Here

Post a Comment

0 Comments

close