सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव- २०२४" हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सोपी वाक्ये व उतारा वाचन 100 संच वाचण्यासाठी येथे टच करा
शिष्यवृत्ती परीक्षा उतारे वाचन विविध संच - Click Here
वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारांची क्षितिजे विस्तारित होतात, आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात, आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. तसेच, वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्म-साक्षात्कार होतो. म्हणूनच, वाचन ही एक आवश्यक व उपयुक्त क्रिया आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.
महाराष्ट्रातील वाचन चळवळ - राज्यातील सर्व शाळांमध्ये "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राबविण्याबाबतचा निर्णय दिनांक २२ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयाने घेण्यात आला होता. मा. राज्यपाल महोदय यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री, मा. शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर उपक्रमामध्ये ६६,००० शाळा व ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सदर उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला होता. सदर उपक्रमास रिड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबदला सहकार्य केले होते.
महावाचन उत्सव - 2024
सन २०२४-२५ या वर्षात स्टार्स या केंद्र पुरुस्कृत योजनेंतर्गत SIG १ मधील परि. १.२. ७ अन्वये Foundation literacy & Numeracy या मुख्य घटकांतर्गत NIPUN Utsav, Reading campaign & other State initiatives या उप घटकांसाठी रु. ८७५.०० लक्ष इतका निधी उपलब्ध आहे. या उप घटकांच्या अंमलबजावणीसाठी तसेच सन २०२३-२४ मधील वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महावाचन उत्सव - 2024 शासन निर्णय :-
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
Read to me app (Student / Teacher version) - Click Here
सदर महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
१. महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाची व्याप्ती:-
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी, इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहेत :-
२. महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाची उद्दिष्टे:-
१) वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे.
३) मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे.
४) दर्जेदार साहित्याचा व लेखक कींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे,
५) विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे.
६) विद्यार्थ्याच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे.
३. महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाचा कालावधीः-
दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.
शाळा नोंदणी - दि.१६/०८/२०२४ ते दि. २३/०८/२०२४ पर्यंत
विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन करणे - दि.२०/०८/२०२४ ते दि. ३०/०८/२०२४ पर्यंत
मुख्यध्यापकांनी लेखन / व्हिडिओ अपलोड करणे - दि.२०/०८/२०२४ ते दि. २९/०८/२०२४ पर्यंत
मूल्यांकन कालावधी - दि. २१/०८/२०२४ ते दि.१५/०९/२०२४ पर्यंत
शाळास्तर मूल्यांकन कालावधी
दि. २१/०८/२४ ते दि. ३०/०८/२४
तालुकास्तर मूल्यांकन कालावधी
३१/०८/२४ ते ०६/०९/२४
जिल्हास्तर मूल्यांकन कालावधी
०७/०९/२४ ते ११/०९/२४
राज्यस्तर मूल्यांकन कालावधी
१२/०९/२४ ते १५/०९/२४
मूल्यांकनाचे स्वरुप :- महावाचन उत्सव-२०२४ या उत्सवात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लेखनांचे मूल्यांकन खालील प्रमाणे करावे.
विषयाची निवड व लिखाणाची पध्दत (३ गुण):-
विद्यार्थ्यांने वाचनासाठी निवडलेल्या पुस्तकांचा विषय, लिखाणासाठी विद्यार्थ्याने वापरलेली भाषा, शुध्दलेखन, हस्ताक्षर, नीटनेटकेपणा इ.
आकलन व अभिव्यक्ती (५ गुण) :
विद्यार्थ्यांने वाचलेल्या पुस्तकाचे किंवा विषयाचे त्या विद्यार्थ्याला झालेले आकलन विचारात घेवून गुणांकन करावे.
विद्यार्थ्यांने वाचलेल्या पुस्तकांचा परिचय स्वभाषेत करणे, पुस्तकाबाबतचे मत, विद्यार्थ्यांची वैचारिक भूमिका इ.
मुखपृष्ठ, मलपृष्ठ, चित्रे, फोटो, आकृत्या इ. बाबत मत (२ गुण):
पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ, अंतरंगातील चित्रे, फोटो, आकृत्या इ. बाबतचे मत.
उपरोक्त तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे १० च्या मर्यादेत शाळेच्याच शिक्षकांनी गुणदान करावे. शिक्षकांच्या केलेल्या गुणदानानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर गुणांकन करण्यात यावे. शाळांनी आपल्यास्तरावरील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थीची निवड करावी. प्रत्येक शाळेने फक्त प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची नावे तालुकास्तरावर पाठवावी. प्रत्येक तालुक्यातील निवड करण्यात आलेले प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक जिल्ह्यास कळविण्यात यावे.
तालुक्यातून पात्र विद्यार्थ्यांच्या यादीतून जिल्हास्तरावर (मनपासह) प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.
जिल्ह्यांकडून पात्र विद्यार्थ्यांमधून राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांची निवड करण्यात यावी.
४. महावाचन उत्सव-२०२४ उपक्रमाचे स्वरुपः-
i) या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावे व त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी.
ii) या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करुन वाचन करतील.
iii) सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरुपात महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा असेल.
iv) सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाची व्हिडिओ/ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील.
v) वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरविण्याची जबाबदारी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची असेल. यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय / खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी. कार्यक्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी यासाठी वर नमूद अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.
५) महावाचन उत्सव-२०२४ अंमलबजावणी करणारी यंत्रणाः-
सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे. रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची राहील. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असेल.
६. महावाचन उत्सव-२०२४ परिक्षण व पारितोषिके
i) उपरोक्त परिच्छेद ४ (ii) व (iv) मधील नमूद उपक्रमासाठी तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग व राज्य या स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रामांकावरील विद्यार्थ्यास पारितोषिक अनुज्ञेय असेल, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राचा दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित/व्हिडिओ/ऑडिओ क्लिप या स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येईल. प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांची निवड तीन वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे करावयाची आहे.
ii) पारितोषिकांचे स्वरुप काय असावे याचा निर्णय राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी घ्यावा.
iii) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अन्य एका स्वतंत्र शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा-२ हे अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येणार आहे. या शासन निर्णयान्वये केंद्र, तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग व राज्य स्तरावर सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या स्तरावर समित्यांचे गठन प्रस्तावित आहे. याच समित्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा-२ मधील सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यांकन करतेवेळी महावाचन उत्सव-२०२४ या उपक्रमात सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे आवश्यक राहील. मूल्यांकनाची प्रक्रिया दिनांक ०५.०९.२०२४ रोजीच्या नियोजित राष्ट्रीय शिक्षक दिन कार्यक्रमापुर्वी करणे आवश्यक राहील. या कार्यक्रमात या उपक्रमाचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण करण्याचे प्रस्तावित आहे.
iv) महावाचन उत्सव-२०२४ या उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रचार व प्रसार या उद्दिष्टासाठी उपलब्ध असलेल्या निधीपैकी रु.३ कोटी (अक्षरी रुपये तीन कोटी) इतका निधी उपलब्ध करुन द्यावा. सदर खर्चास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समन्वयाने याबाबतची संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची राहील.
७. या उपक्रमासाठी स्टार्स या केंद्रपुरुस्कृत योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून प्रचार व प्रसार यासाठीचा खर्च वगळता कोणत्या बाबीसाठी किती निधी खर्च करण्यात यावा, हे राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई ठरवतील.
८. सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई हे आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित करतील.
९. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग भाग-३, अनुक्रमांक ४ मधील परिच्छेद क्रमांक २७ (२) (ब) अन्वये प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
१०, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७१६१२०३०९९४२१ असा आहे.
0 Comments