Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

यावेळची निवडणूक ड्युटी जास्त त्रासदायक

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
निवडणूक आयोगाच्या सूचनांनंतरही यावेळी निवडणूक ड्युटी लावलेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे इतक्या निवडणुका झाल्या, मात्र यावेळची निवडणूक ड्युटी सर्वात जास्त त्रासदायक, गैरसोयीची आणि चीड आणणारी होती, अशा तक्रारी शिक्षकांनी केल्या असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी 'मटा'ला दिली.
शिक्षिकांना ड्युटी देताना शाळेपासून कमाल दहा किलोमीटरवर द्यावी, अशा आयोगाच्या साधारण सूचना आहेत. मात्र असे असतानाही महिला शिक्षकांना घरापासून ४०, ५० किलोमीटरवर दुर्गम भागात ड्युटी देण्यात आली. यंत्रणेच्या लक्षात आणून दिल्यानंतरही आमची चूक असली तरी ड्युटी करायला लागेल असा त्यांचा खाक्या होता. नाइलाजाने महिलांनी ड्युटी केली. कोणतीही सुरक्षिततेची हमी नाही, अनोळख्या जागी मुक्कामाची सोय नाही, स्वच्छतागृह-आंघोळीची सोय नाही, अशा तक्रारी शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांनी केल्या. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या साहित्यामुळे शाळेत मुक्काम करावा लागतो. मात्र त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची तजवीजच यंत्रणेने केलेली नव्हती. अनेक शाळांमध्ये मंगळवारी निकाल होता. त्यामुळे सोमवारी उशिरापर्यंत निवडणूक कामासाठी थांबलेल्या शिक्षकांना मंगळवारी सकाळी लवकर शाळा गाठावी लागली. मात्र या सर्व प्रकाराबद्दल विशेषत: यंदाच्या अनुभवाबद्दल शिक्षक मोठ्या प्रमाणावर नाराज होते, असेही दराडे यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या वेळी तरी या चुका सुधाराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

close