Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्रीय स्वयंपाकघरातून विद्यार्थ्यांना जेवण

म. टा. वृत्तसेवा, पालघर
पालघर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांना केंद्रीय स्वयंपाकघरातून जेवणाचे डबे पुरविण्यात येणार असून त्याची सुरुवात सोमवारपासून जव्हार तालुक्यात करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना दोन वेळा नाष्ता, दोन वेळा पोटभर जेवण देण्यात येत आहे.
आदिवासी विकास प्रकल्प १९७२पासून सुरू झाल्यानंतर मागावर्गीय भागात निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. मात्र आश्रमशाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत लाकडांचा जाळ करून जेवण, नाष्ता, चपाती, भात, भाजी बनविण्यात येत असे. त्यानंतर गॅस जोडणी आली. मात्र तरीही आश्रमशाळांना व्यवस्थित जेवण मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असत. जव्हार प्रकल्पातील आदिवासी आश्रमशाळांना सोमवारपासून आदिवासी विकास विभागामार्फत केंद्रीय स्वयंपाकघरातून जेवणाचे डबे पुरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आश्रमशाळेतील मुलांना चांगल्या प्रतीचे जेवण मिळणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या तक्रारी कमी होतील, अशी अपेक्षा केली जात आहे.
जव्हार आदिवासी प्रकल्प क्षेत्रात ३० सरकारी आश्रम शाळा आहेत. त्यापैकी सोमवारपासून केंद्रीय स्वयंपाकघराद्वारे २५ आश्रमशाळांतील निवासी विद्यार्थ्यांना डब्बे पुरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच यापैकी काही आश्रमशाळा आणि विक्रमगड व वाडा तालुक्यातील आश्रमशाळा डहाणू येथील केंद्रीय स्वयंपाकघराला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता डबेपद्धत सुरू झाल्याने चांगले जेवण, गोड पदार्थ मिळणार आहेत. केंद्रीय स्वयंपाकघराला जिल्ह्यातील सरकारी आदिवासी आश्रम शाळा जोडण्यात आल्याने प्रकृती स्वास्थ्य चांगले रहील. विद्यार्थ्यांचे आजाराचे प्रमाणदेखील कमी राहणार असल्याचे आश्रमशाळेतील काही अधीक्षकांनी सांगितले.
जव्हार आदिवासी प्रकल्पक्षेत्रातील विनवळ येथे केंद्रीय स्वयंपाकघर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी नाष्ता, दुपारी जेवण, ३ वाजता नाष्ता आणि संध्याकाळी पुन्हा जेवण अशा पद्धतीचे डबे सुरू करण्यात आले आहेत. या जेवणात भात, चपाती, दोन वेगवेगळ्या भाज्या, पापड, लोणचे, काकडी, असा आहार सुरू केला आहे. केंद्रीय स्वयंपाकघराकडून सुरू करण्यात आलेला हा उत्तम प्रतीचा आहार घेऊन मुलेही समाधान व्यक्त करत आहेत.
मुलांकडून स्वागत
केंद्रीय स्वयंपाकघरातून डबे सुरू करण्यात आल्याने वांगणी आश्रमशाळेतील मुलांनी व शिक्षकांनी डबेपुरवठादारांचे स्वागत केले. रोज वेळच्या वेळी असे जेवण, नाष्ता मिळावा, असे सांगितले. जेवण उत्तम असल्याचेही मुलांनी सांगितले. मुलांना मिळणाऱ्या या डब्यातील जेवणामुळे मुलांचे पालकदेखील खुश असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments

close